पुणे : शहरात बनावट आैषधांची विकी करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे.
बनावट औषधांची शहर आणि जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील एका औषध वितरकास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

वितरक आणि कंपनी संचालकांविरोधात गुन्हा

अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) करण्यात आलेल्या कारवाईत हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी बनावट औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी उमेद फार्मा सेल्सचे भागीदार प्रभाकर नामदेव पाटील (रा. कल्याणीनगर) यांना अटक करण्यात आली. उमेद फार्मा सेल्सचे भागीदार तसेच मॅक्सरिलीफ हेल्थकेअर औषध निर्मिती कंपनीचे संचालक सुदीप सुरेशकुमार मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशात दाखविली निर्मिती

हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्य़ात अंजी येथील मॅक्सरिलिफ हेल्थकेअर कंपनी असून तेथे औषध निर्मिती केली जात असल्याचे भासविण्यात आले होते. प्रत्यक्षात मॅक्सरिलिफ हेल्थकेअर कंपनीच्या नावाने कोरोना संसर्गावरील उपचारांसाठी वापरली जाणारी फविपिराविर, हायड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधांची निर्मिती हिमाचल प्रदेशात केली जात असल्याचे औषधांवरील लेबलवर छापण्यात आले होते. याबाबत हिमाचल प्रदेशातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे विचारणा करण्यात आली, तेव्हा मॅक्सरिलिफ हेल्थकेअर नावाच्या कोणत्याही कंपनीला औषध निर्मितीचा परवाना दिला नसल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दीड कोटींची आैषधे जप्त

अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एक कोटी ५४ लाख रुपयांची बनावट औषधे मुंबईत जप्त केली होती. सुदीप मुखर्जी यांनाही अटक करण्यात आली. तपासणीत या कंपनीकडून विनापरवाना वेगवेगळ्या प्रकारच्या पाच औषधांची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर राज्यातील सर्व अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयांना याबाबतची माहिती देण्यात आली.