राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शासनाकडे मराठा समाजासाठी प्रमुख पाच मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ६ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या आंदोलनात इंदापूर तालुक्यातील मराठा समाज पूर्ण ताकदीने उतरणार असल्याची प्रतिक्रिया इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी दिली. मयूरसिंह पाटील म्हणाले की, खासदार संभाजीराजे यांनी जी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे ती स्वागतार्ह आहे.

९ सप्टेंबर २०२० पर्यंत शासकीय खात्यांमध्ये मराठा समाजातील युवक-युवती यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यांना तत्काळ रुजू करून घ्या, ही अत्यंत महत्त्वाची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे. यासह चार मागण्या गरीब मराठा समाजाला न्याय देणाऱ्या असणार आहेत.

Advertisement

सरकार भरीव निधी देणार नसेल तर सारथी संस्था बंद करा. अशी संस्था शाहू महाराजांच्या नावाने नको, हा आग्रह मराठा समाजाच्या हितासाठी आहे. ज्या सवलती शिक्षणामध्ये ओबीसींना मिळतात या मराठा समाजातील गरिबांना झाला पाहिजे, अशी भूमिका अत्यंत आक्रमकपणे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेली आहे.

अशा पाच मागण्यांचा विचार राज्याचे मुख्यमंत्री व सरकारने केलाच पाहिजे व या मागण्या देखील मान्य झाल्या पाहिजेत यावर इंदापूर तालुक्यातील तमाम मराठा समाज ठाम असणार आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ६ जूनला इंदापूर तालुक्यातील मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रायगडावर दाखल होईल, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

Advertisement