इंधन दरवाढीमुळे वाहनचालक बेजार झाले असतानाच आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेल्या मारुती सुझुकीच्या गाड्या देखील महागणार आहेत. वाहनांना लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत वाढ झाल्याने गाड्यांच्या दरात जुलै ते सप्टेंबर महिन्यात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मारुती सुझुकीने दिली.

दरम्यान, मारुतीपाठोपाठ इतर वाहनांच्या किमती देखील वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी वाहनांच्या किमतीत वाढ केली जाणार असल्याचे जाहीर केले.

मुंबई शेअर बाजाराला देखील यासंदर्भातील माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, मागील एक वर्षापासून वाहनांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे वाहनांच्या उत्पादन खर्चावर परिणाम होत आहे.

Advertisement

त्यामुळे कंपनीने आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान ही वाढ केली जाणार असल्याचे म्हटले गेले असले तरी कोणत्या वाहनांची, तसेच किती दरवाढ केली जाणार, याबाबतचा खुलासा कंपनीकडून करण्यात आला नाही.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यात मारुतीसारख्या कंपनीकडून गाड्यांच्या दरात वाढ केली जाणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आणखीच फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर मारुतीपाठोपाठ इतर वाहन कंपन्या देखील दरवाढीचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

Advertisement