एखाद्या शहराच्या प्रश्नावर जेव्हा मंत्रालयात बैठका होतात, तेव्हा त्या शहराचा नगराध्यक्ष किंवा महापाैरांना तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा आयुक्तांना बोलविणे अपेक्षित असते.

राजशिष्टाचारही तसाच आहे; परंतु पुण्याच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या बैठकीला पुण्याच्या महापाैरांना बोलविण्यात आलेले नाही.

तातडीची बैठक

पुणे शहरतील विविध प्रश्नांवर आज सायंकाळी सहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही तातडीची बैठक मुंबईत बोलावली असून त्याला महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रणच नाही.

Advertisement

विविध खात्यांचे मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये पुण्याच्या महापौरांचे नावच दिसून आले नाही.

कोण कोण उपस्थित राहणार ?

राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी शहरातील महत्वाचे प्रश्न मांडून त्यावर अजित पवार यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सतार, सतेज पाटील, बच्चू कडू, आमदार चेतन तुपे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

बैठकीतील विविध प्रश्न

म्हाडाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन, शिक्षण विभागातील रजा मुदतीतील शिक्षकांना कायम करण्याबाबत, समाविष्ट २३ गावांमधील शाळा महापालिकेस हस्तांतरित करणे, येरवड्यामध्ये अग्रेसन शाळा ते बालग्राम येथील शासनाची जागा महापालिकेला हस्तांतरित करणे, कळस विश्रांतवाडी येथील आरक्षित मुस्लिम – ख्रिश्चन दफनभूमीची जागा हस्तांतरित करणे, शिक्षण विभागाचा आकृतीबंध मान्य करणे, महापालिकेचे शासनाकडे प्रलंबित असलेले इतर विषय, अशा विविध प्रश्नांवर बैठक होणार आहे.