पुण्याच्या प्रश्नांवरील बैठकीचे महापाैरांना होते निमंत्रण

“ महापाैर मुरलीधर मोहोळ यांना पुण्याच्या प्रश्नावरील बैठकीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयातून रितसर निमंत्रण देण्यात आलं.

आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं; मात्र त्यांनी आपल्या घरी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला.

त्यामुळे या मान-अपमानाच्या वादात नेमकं कोण खरं बोलतं आणि कोण खोटं असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिला आहे

महापाैरांच्या काकांचा मृत्यू

मंत्रालयात पुण्यातील प्रश्नांसाठी आयोजित बैठकीला आपल्याला आमंत्रण मिळाला नसल्याचा आरोप महापौर मोहोळ यांनी केला. तसेच असं करून पुणेकरांना डावलल्याचं मत व्यक्त केलं.

या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं. पुणे महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या, “महापौरांच्या घरी त्यांच्या काकांचा मृत्यू झाला. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना निमंत्रण होतं; मात्र ते या कारणामुळे येऊ शकले नाहीत.

या बैठकीत पुण्याच्या विकासाबाबत प्रश्न मांडले गेले. महापौरांनी याबाबत काही गैरसमज करून घेऊ नये असं मला वाटतं.

व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सहभागासही नकार

उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून महापौरांना रीतसर निमंत्रण दिलं होतं. आमचे सहकारी आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन केला होता.

महापौरांच्या घरी दुर्देवी प्रकार घडल्याने व्हिडिओ काॅन्फरन्सिगंमध्येसुद्धा उपस्थित राहू शकत नाही असे त्यांनी आमच्या आमदारांना सांगितलं, असं धुमाळ म्हणाल्या. या बैठकीला हडपसर आमदार चेतन तुपे, वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे देखील उपस्थित होते.

बैठकीत नेमकी काय चर्चा?

या बैठकीत म्हाडा कॉलनीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निर्णय घेण्यात आला. अंबील ओढा आणि इतर वसाहतीबाबत न्यायालयाने निर्णय दिले होते. यामध्ये ओढ्याच्या भिंतीबाबत काय करावे, याबाबतसुद्धा निर्णय झाला. वसाहतींना वाचवण्यासाठी आतमध्ये पूर जाऊ नये म्हणून भिंती बांधायचा निर्णय आज पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

महापौरांचा नेमका आरोप काय ?

मोहोळ म्हणाले, “महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे.

कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही.

उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो; मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करून न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत.