राज्यातील पूरस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल.

आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करून ठेवण्यात आला आहे.

त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पाठवण्यात आली आहे. मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Advertisement

साथीचे आजार पसरण्याची भीती

महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. चिपळूणमध्ये तर पावसानं हाहा:कार माजला आहे. चिपळूणची बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड आणि घरंही पाण्यात बुडाली होती.

आज चिपळूणमधील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. असं असलं तरी अजून दोन दिवस कोकणात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

दरम्यान, पूरस्थिती कमी झाली असली तरी आता मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर टोपे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

कोल्हापुरात नागरिकांना हलविण्यास सुरुवात

राज्यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांसह आता कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.

या गावातील घरांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाही शिरलं आहे. त्यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यांना घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.

दोन गावे पाण्याखाली

पंचगंगा नदीची पाणी पातळी 53 फुटांवर गेल्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन्ही गावं पाण्यात बुडाली आहेत. 2019 च्या महापुरातही ही गावं पाण्यात बुडाली होती.

Advertisement

त्यामुळे सावधगिरी म्हणून नागरिकांना घरातून बाहेर पडण्याचं आवाहन रेस्क्यू टीमकडून करण्यात येत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

त्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसंच कोल्हापूर शहरातून महामार्गाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात झाले आहेत. नदीच्या पाणीपातळीत अशीच वाढ होत राहिली तर परिस्थिती गंभीर बनू शकते.

Advertisement