पुणे – मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) इंडियाचे एमडी आणि सीईओ ‘मार्टिन श्वेंक’ (martin schwenk) यांची एक इंस्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, त्यांची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. ‘मार्टिन श्वेंक’ (martin schwenk) यांना नुकताच पुण्यातील वाहतूक कोंडीचा (Pune Traffic) फटका बसल्याच पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. त्यानंतर आता मर्सिडीज बेंझचे (Mercedes-Benz) सीईओ मार्टिन श्वेंक यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसला.

आपल्या पोस्टमध्ये ‘मार्टिन श्वेंक’ म्हणतात.., “जर तुमची एस-क्लास पुण्याच्या रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये अडकली तर तुम्ही काय करता? कदाचित कारमधून उतरून काही किलोमीटर पायी चालणं सुरू करता आणि मग रिक्षा पकडता”.

सध्या त्यांची पोस्ट पुण्यात चर्चेचा विषय बनली आहे. मार्टिन श्वेंक यांनी 29 सप्टेंबर रोजी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्यांची ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. यावर लाईक्स आणि शेकडो कमेंट्स वर्षाव झाला आहे.

दरम्यान, मार्टिन श्वेंक हे 2018 पासून मर्सिडीज-बेंझ इंडियाचे सीईओ आहेत. त्यापूर्वी त्यांनी मर्सिडीज-बेंझ चीनचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले आहे. 2006 पासून ते या ब्रँडशी जोडलेले आहेत.

मर्सिडीज सर्वात सुरक्षित आणि आलिशान गाड्यांपैकी एक. आपल्याकडेही मर्सिडीज असावी असं स्वप्न अनेकांचं असतं. भारतात या कारच्या सर्वात स्वस्त मॉडेलचीच किंमत 49.92 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र, हीच आलिशान मर्सिडीज आता पुण्याच्या वाहतूक कोंडीची शिकार झाली आहे.