पुणे – महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आगामी काळात दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे लवकरच दुधाच्या टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार असून, दुधाच्या (Milk) दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर आज पुण्यात (Pune News) राज्यातील विविध दूध संघांची बैठक कात्रज (Katraj) येथे पार पडत आहे.

सध्या अनेक दूध (Milk) उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून जास्तीच्या दराने दूध खरेदी करतात, त्याचा परिणाम दरवाढीवर होणार असल्याची शक्यता आहे. बैठकीत उपस्थित सदस्यांनी दूध खरेदीचे दर वाढवण्याची मागणी केली आहे.

देशातील अनेक राज्यात लम्पी स्कीन आजार पसरला आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत.

लम्पी आजारामुळे पशुधन कमी झाल्याने दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळं दुधाचे दर आणखी वाढू शकतात.

अमूल सारख्या कंपन्या जास्त दराने दूध खरेदी करत असल्यामुळे आपल्यालाही आगामी काळात दूध खरेदीचे दर वाढवावे लागतील, अशी चर्चा या बैठकीत झाली.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आगामी काळात दूध दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर, काहीदिवसांपूर्वीच म्हणजेच येणं दिवाळीच्या तोंडावर अमूलने फुल क्रिम दुधासह म्हशीच्या दूधात दरवाढ केली होती.

आणि त्या पाठोपाठ राज्य सहकारी गोकुळने म्हशीच्या दूध दरात वाढ केली. नव्या दरांप्रमाणे आता गोकुळकडून म्हशीच्या दूध विक्री दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दूध दरवाढ मुंबई आणि पुणे शहराकरता लागू आहे.

मुंबई आणि पुण्यात एक लिटर दुधाची किंमत 66 रुपयांवरून 69 रुपये झाली आहे. तर, अर्धा लिटर दुधाची किंमत 33 रुपयांवरून 35 रुपये झाली आहे. यापूर्वी दीड वर्षांत गोकुळने सहा वेळा दूध दरात वाढ केली आहे.