राज्यात दुधाचे दर वाढणार

राज्यात अमूल, गोकूळ पाठोपाठ मदर्स डेअरीने ही दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. सरासरी दोन रुपयांनी दुधाच्या विक्रीदरात वाढ झाली आहे. या तीन संस्थापाठोपाठ आता अन्य दूध संघही दुधाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या खिशाला चाट

महाराष्ट्रात आता दूधाचे दर वाढणे क्रमप्राप्त आहे. गोकुळच्या या निर्णयानंतर राज्यातील इतर दूध संघही दरवाढ करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील नागरिकांना दुधासाठी जादा पैसे मोजावे लागतील.

कोल्हापूर, सातारा, सांगलीला दरवाढीतून वगळले

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून गोकुळ दुधाच्या दरवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

त्यानुसार गायीच्या आणि म्हशीच्या दूधासाठी आता प्रतिलीटरमागे दोन रुपये जास्त द्यावे लागतील. तुर्तास ही दरवाढ कोल्हापूर, सांगली आणि कोकणात लागू होणार नाही.

गोकुळच्या दुधाचा दर आता किती?

सध्या गायीच्या एक लीटर दुधासाठी 47 रुपये मोजावे लागत आहेत. ही किंमत आता 49 रुपये इतकी होईल, तर म्हशीच्या दुधाची किंमत प्रतिलीटर 58 रुपयांवरुन 60 रुपये झाली आहे.

उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाकडून राज्यभरात दररोज 12 लाख लीटर दूधाची विक्री केली जाते.

मदर डेअरीचं दूध महागलं

इंधन दर आणि विजेचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक संघाचा खर्च वाढला आहे. हे कारण देत दूध संघांकडून दूध दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एक जुलै रोजी अमूलने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

आता दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथे एक जुलैपासून अमूलचे दूध उत्पादन महागले आहे.

अमूलने तब्बल दीड वर्षानंतर दूध विक्रीचे दर वाढवले आहेत. त्या पाठोपाठ आता मदर डेअरीनेदेखील दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.