वीस वर्षांहून अधिक काळ वापरात असलेले सीमकार्ड बंद करून, ते तीन वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर वापरात असल्याचे आढळले.

वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारींचा पाठपुरावा केल्यानंतर या अतिश्रीमंत व्यक्तीचे सीमकार्ड सुरू झाले असले, तरी आरोपी मात्र मोकाट आहेत.

मोबाईल कंपन्यांची उडवाउडवीची उत्तरे

कोरेगाव पार्क येथील अतिश्रीमंत व्यक्तीचे वीस वर्षांपासून वापरात असलेले स्पेशल सीमकार्ड अचानक बंद झाले. त्यांचे सीमकार्ड नाशिक, सुरत आणि भूतानमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने सुरू असल्याचे कळताच त्यांना धक्का बसला.

Advertisement

त्यांनी संबंधित मोबाईल कंपनीत कशी केली असता, त्यांना उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे, दूरसंचार मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) पाठपुरावा केल्यानंतर त्यांचे सीमकार्ड सुरू झाले.

नाशिक, सुरत, भूतानला पोर्ट

राहुल भारद्वाज यांनी वीस वर्षांपूर्वी पन्नास हजार रुपये देऊन एका मोबाईल कंपनीचे स्पेशल सीमकार्ड विकत घेतले होते. त्या सीमकार्डची आता दीड लाख रुपये किंमत आहे.

ते सीमकार्ड पंधरा दिवसांपूर्वी अचानक बंद झाले. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईल कंपनीत चौकशी केली, तेव्हा त्यांचे सीमकार्ड नाशिक येथील ग्राहकाने पोर्ट केल्याचे कळले.

Advertisement

त्यांनी अधिक चौकशी केली, तेव्हा त्यांचे सीमकार्ड तीन मोबाईल कंपन्यांमध्ये पोर्ट केले असून नाशिक, सुरत आणि भुतान याठिकाणी ते सुरू असल्याचे कळताच त्यांना धक्का बसला.

पोर्ट केलेली कार्ड बंद

भारद्वाज यांनी तत्काळ कोरेगाव पार्क पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तातडीने संबंधित मोबाईल कंपन्यांमध्ये भारद्वाज यांना पाठवून तक्रार अर्ज दाखल करण्यास सांगितले. कंपनीने गोपनीयतेचे कारण देऊन, त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली.

त्यानंतर ते भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) गेले. तेथेसुद्धा त्यांची निराशा झाली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयात पत्रव्यवहार केला.

Advertisement

मंत्रालयाने घटनेचे गांभीर्य ओळखून, ‘ट्राय’ला संबंधित मोबाईल कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सांगितले.

‘ट्राय’ने दखल घेताच मोबाईल कंपन्यांनी सारवासारव करून त्यांच्याकडे पोर्ट झालेले तीनही सीमकार्ड तातडीने बंद केले.

Advertisement