आमदार नीलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी बीड जिल्हयातील उमापूर येथे आ. लंके यांची काशीवरून आणलेल्या पाण्याने ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात पादयपुजन करण्यात आले.

आ. लंके यांचे उमापुरमध्ये आगमन होताच जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हजारो तरूणांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात आ. लंके यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले.

यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, केवळ मतदार संघातीलच नव्हे तर राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील रूग्णावर शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात उपचार करण्यात आले. आतापर्यंत तेथून १० हजारांपेक्षा अधिक रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

विशेष म्हणजे या आरोग्य केंद्रामधील एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. ३०, ४० प्राणवायू किंवा २३ एचआरसीटी स्कोअर असलेल्या रूग्णांनीही तेथे कोरोनावर मात केली.

कोरोनाच्या भितीमुळे ८० टक्के रूग्ण दगावतात. त्यांना मानसिक आधार देण्याचे काम आपण आरोग्य मंदीरात केले. आरोेग्य मंदीरात उपचार करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. प्रत्येक माणसाचा जिव वाचला पाहिजे यासाठी आपण काम केले.

मला कोरोनाचे औषध सापडले !

कोरोना बरा करण्यासाठी मला औषध सापडले आहे ! ते इतर कोणाला सापडले नाही. कोरोनाची बाधा झालेले ८० टक्के रूग्ण भीतीने मृत पावले. शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात मी रूग्णांची भीती घालविण्याचे काम केले.

रूग्ण बरे करण्यासाठी हायपावर इंजेक्शन अथवा गोळया वापरल्या नाहीत. रेमडेसिवरचाही वापर केला नाही. केवळ मानसिक अधार देण्याचे काम केले. त्यातूनच सर्व रूग्ण बरे झाल्याचे आ. लंके म्हणाले.

कोरोना संकटाच्या काळात उमापूर भागातील रूग्णांवर आ. लंके यांनी उपचार केले. अगदी रेमरेसिवीर इंंजेक्शनही उपलब्ध करून दिली. कोरोनामुळे सर्वत्र भितीचे वातावरण असताना आ.लंके यांनी मात्र जिवावर उदार होऊन आमच्या लोकांची काळजी घेतली.

त्यामुळेच त्यांचे काशीच्या पाण्याने पाद्यपुजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आ. लंके यांनी आमच्यासाठी दिलेल्या योगदानासाठी माझ्या त्वचेची पादत्राणे केली तरीही त्यांचे उपकार फिटणार नाहीत अशी भावनीक प्रतिक्रीया किरण आहेर या कार्यकर्त्याने दिली.