पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये रोज थोडी-थोडी वाढ करून आता पेट्रोलने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीयांच्या हाल अपेष्ठामध्ये भर घातली असून मोदी सरकार मात्र निष्क्रीय व झोपी गेलेले आहे. जनतेचा आक्रोश त्यांना ऐकू येत नाही.

या कोरोना काळात आता डिझेल व पेट्रोलचे दर तातडीने कमी करावेत व त्यासाठी डिझेल, पेट्रोलवरील केंद्र सरकारचा अबकारी कर (एक्साईज ड्युटी) मोठ्या प्रमाणात कमी करावी, अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे डिझेल, पेट्रोल दरवाढविरोधी आंदोलनावेळी केली.

शंकरशेठ रस्त्यावरील सरस्वती पेट्रोल पंपाजवळ डिझेल, पेट्रोल दरवाढीच्या विरोधात झालेल्या निदर्शनात शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, पुणे मनपा गटनेते आबा बागुल यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Advertisement

या निदर्शनांच्या वेळी अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होऊन मोदी सरकारचा धिक्कार केला. यावेळी रमेश बागवे म्हणाले, गेल्या सात वर्षांत मोदी सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले आहे. महागाई, बेकारी, कोरोना यांची झळ प्रत्येक नागरिकाला पोहोचत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता स्वत:ची प्रतिमा कुरवळत बसण्याऐवजी नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असून जनतेच्या हिताचे आतातरी निर्णय घ्या, असे त्यांनी सांगितले. ॲड. अभय छाजेड म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १४० डॉलर्स प्रती बॅलर एवढे पोहोचले होते.

तरीही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली डॉ. मनमोहन सिंग सरकारने देशातील पेट्रोलचे दर ७० रुपये प्रती लीटर एवढे मर्यादित ठेवले.

Advertisement

मोदी सरकारने मात्र आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ३० डॉलर्स प्रति बॅलर एवढे खाली येऊनही जनतेला दिलासा न देता उलट एक्साईज ड्युटी वाढविली म्हणूनच पेट्रोलने शंभरी गाठली आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची कुवत व धमक मोदी सरकारमध्ये नसून मोदी सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.