file photo

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत तास भेट घेऊन चर्चा केली. त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात असले, तरी या भेटीने काँग्रेस मात्र बॅकफूटवर गेली आहे.

मित्रपक्षावर कुरघोडी अंगलट

पक्षवाढीच्या भूमिकेतून मित्रपक्षांवर कुरघोडी करून काँग्रेसने राजकीय माहोल तयार केला खरा; पण पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन राजकीय खळबळ उडवून दिली.

परिणामी, महाविकास आघाडीतील मित्रांच्या माहोल, खळबळीने ते एकमेकांना आव्हान देत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या भूमिकांची चर्चा वाढतानाच पवार यांच्या भेटीगाठींच्या खेळीने काँग्रेस ‘बॅकफूट’वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

भेटीगाठीने वातावरण बदलले

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या रोजच्या भूमिका, विधाने आणि इशाऱ्यांमुळे गेल्या काही दिवस काँग्रेसच्या गोटात उत्साह असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना बोलावून काँग्रेसच्या मनात नेमके काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न पवार यांनी केल्याचे पुढे आले.

त्यानंतर मात्र, पवार यांनी लगेचच मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. त्याआधी फडणवीस हे पवार यांच्यात चर्चा झाली आणि दिल्लीत पंतप्रधान मोदी, पवार यांच्यात जवळपास तासभराचे गुफ्तगु झाल्याची चर्चा आहे.

थोडी झुकणार

या भेटीगाठी पाहता नवी राजकीय समीकरण जुळली जातील, याचा अंदाज बांधला जात आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता पवार यांनी भाजप नेत्यांच्या घेतलेल्या भेटींचा काँग्रेस नेत्यांनी अद्याप कोणताही अर्थ जाहीर केला नाही.

Advertisement

पवार यांच्या पवित्र्यापुढे काँग्रेस थोडी का होईना पण झुकेल, असे सांगण्यात आले. म्हणजे, गेल्या काही दिवसांतील पक्षविस्ताराची भाषा, त्यातून पुढे आलेले स्वबळ, मित्रपक्षांवर ठपका ठेवताना केलेला पाळत ठेवण्याचा आरोप, यापासून काँग्रेस बॅकफूटवर येईल, असे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.

सत्तेत राहावेच लागेल

सध्याच्या स्थितीत महाराष्ट्रात काँग्रेस वाढण्याचे संकेत दाखविले जात असले तरी शिवसेना, राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहावेच लागेल. या दोन पक्षांना समजून घ्यावे. ज्यामुळे विरोधकांना नवे कोलीत मिळणार नाही,

असे सूचक विधानही काँग्रेसच्या या नेत्याने केले आणि काँग्रेसला भूमिका घेताना आघाडीचा विचार करावा लागेल, हेही या नेत्याने स्पष्ट केले.

Advertisement