सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण खोटी ठरवित पुणे प्रदेश विकास प्राधिकरण आणि ठेकेदाराने एक वर्ष होऊनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चाैकातील बहुमजली उड्डाणपुलाला तसेच मेट्रोच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही.

प्रशासकीय दिरंगाईमुळे वाहन कोंडी

गणेशखिंड रस्त्यावर आचार्य आनंदऋषिजी चौकातील उड्डाणपूल पाडून एक वर्ष पूर्ण झाले आहे; पण या वर्षभरात ना हिंजवडी मेट्रोचे काम सुरू झाले, ना येथील नवीन बहुमजली पुलाच्या आराखड्याला अंतिम मान्यता मिळाली.

त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या हजारो वाहनचालकांना दररोज कोंडीतूनच मार्ग शोधावा लागत आहे.

Advertisement

अजून अडीच-तीन वर्षे पुणेकरांचे हाल

येथील बहुमजली पुलाचे कामच अजून सुरू झाले नसल्याने त्यानंतर आणखी अडीच ते तीन वर्षे हीच स्थिती कायम राहणार आहे.

त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) येथील पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

महापालिकेला मान्यतेसाठी मिळेना वेळ

गेल्या वर्षी जुलैमध्ये केलेल्या दहा दिवसांच्या टाळेबंदीचा फायदा घेऊन हा उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

हा पूल पाडून तेथे बहुमजली उड्डाणपूल उभारण्यासह वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे आश्वासन ‘पीएमआरडीए’ने दिले होते.

वर्षभरात हा आराखडा तयार झाला असला, तरी पुणे महापालिकेने त्याला अद्याप मान्यता दिलेली नाही.

राज्य सरकारच्या सूचनांनुसार पीएमआरडीए आणि महापालिका यांनी मिळून सर्व खर्च करायचा असल्याने पालिकेच्या मान्यतेशिवाय हा प्रकल्प पुढे सरकू शकत नाही.

Advertisement

त्यामुळे या पुलाचे काम नेमके केव्हा सुरू होणार आणि त्यानंतर तो पूर्ण होण्यास किती वेळ लागणार, याबाबत जुना पूल पाडल्यानंतरची संदिग्धता एक वर्षानंतरही कायम आहे.