राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण आदींवरून राजकारण पेटले असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ऐरणीवर आणला असून पाच जुलैला विधानभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दोन्ही काँग्रेसने आरक्षणासाठी ठेवले ताटकळत

वंचित बहुजन आघाडी, रझा अकादमीने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षणासाठी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत निर्णय दिला असला, तरीदेखील मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

असे असतानाही धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने अजूनही मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेले नाही. याच कारणासाठी येत्या ५ जुलैला विधानसभवनावर सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Advertisement

कोरोना असला, तरी मोर्चा काढणार

राज्यात कोरोनाचे संकट आहे. कोरोनाच्या लाटांवर लाटा येऊ लागल्या आहेत; मात्र असे असले तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

न्यायालयाने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मान्य केलेले आहे; मात्र सरकारने अद्याप ते जाहीर केलेले नाही. आता सरकारने ते जाहीर करावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

भाजपवरही निशाणा

वंचिच बहुजन आघाडी आणि रजा अकादमीतर्फे काढण्यात येत असलेल्या मोर्चाची माहिती देताना प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

Advertisement

भाजपचे राजकारण आता लोकांच्या लक्षात आले असून उत्तर प्रदेशात दंगल व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

 

Advertisement