शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. ते सातत्यानं सुरू असतं. शिक्षणाची आस असावी लागते. अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे डॉ.कोल्हे यांनी छत्रपतींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी या डिप्लोमा कोर्सला प्रवेश घ्यायचे निश्चित केले आहे.

महाराजांना आणखी जाणून घ्यायचंय

शुक्रवारी दुपारी त्यांनी विद्यापीठात जाऊन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस. उमराणी यांची भेट घेतली. अभ्यासक्रमाचा तपशील आणि इतर माहिती त्यांनी जाणून घेतली.

Advertisement

या वेळी डॉ.कोल्हे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोस्ट गॅज्युएशनचा अभ्यासक्रम हे स्तुत्य पाऊल वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास वाढायला हवा.

अनेक तरुणांना महाराजांना जाणून घेता येईल. महाराजांना आणखी जाणून मला ही घ्यायचंय. अर्थव्यवस्था, व्यवस्थापन कौशल्य आणि इतर सर्व जाणून घ्यायचायं.

त्यासाठी हा अभ्यासक्रम निश्चितच उपयोगी ठरेल. यासाठी मी स्वतः विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊ इच्छितो आणि एक शिवप्रेमी म्हणून पाहिजे ती मदत मी करेल.”

Advertisement

आठशे गुणांचा अभ्यासक्रम

कुलगुरू डॉ. करमळकर यांनी मराठा साम्राज्यावरील अध्यासन आणि अभ्यासक्रमाचा तपशील सांगितला. यावेळी डॉ. विजय खरे, डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.

एकूण 800 गुणांचा हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे. नुकतेच डॉ. कोल्हे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केल्याचे डॉ. खरे यांनी सांगितले.

अभ्यासक्रमात काय आहे ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, जगभरातील योद्धे आणि शिवाजी महाराज, युद्ध शैली, महाराजांची जन्मभूमी ते कर्मभूमी हा प्रवास आदींचा समावेश या अभ्यासक्रमात आहे. त्याचबरोबर एक डेजरटेशनही आहे.

Advertisement

अभ्यासक्रमाला तंजावरचे शिवाजी महाराज यांचे मार्गदर्शन असून छत्रपती शिवाजी महाराजांवरील संशोधन नवीन तथ्ये बाहेर येण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग होईल, असे डॉ. कळमकर यांनी सांगितले