file photo

मुंबई : एका महिलेने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात केलेली छळाची, जीवे मारण्याच्या धमकीची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

न्यायालयाने पोलिस आयुक्तांना अहवाल दाखल करायला सांगितला. पोलिस आयुक्तांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्याने उच्च न्यायालयाने सात दिवसांची मुदत दिली.

राऊतांसह पतीवरही महिलेचा आरोप

संजय राऊत व माझा पती माझा छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार करणारा अर्ज एका उच्चशिक्षित महिलेने उच्च न्यायालयात दाखल केला.

Advertisement

आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यांसारखे आरोप तिने राऊत व तिच्या पतीवर केले आहेत.

या याचिकेवरील २२ जून रोजीच्या सुनावणीत न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मुंबई पोलीस आयुक्तांना २४ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

चाैकशीनंतर सादर करणार अहवाल

मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी सांगितले, की, पोलिस आयुक्तांनी अहवाल सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. आयुक्तांनी कागदपत्रे मागविली आहेत.

Advertisement

ते चौकशीअंती सर्वसमावेशक अहवाल सादर करतील. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत १ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली; मात्र पुढे आणखी मुदतवाढ देणार नाही, असे स्पष्ट केले.

याचिका दाखल केल्यानंतर महिलेला अटक

संबंधित महिलेने ही याचिका न्यायालयात दाखल केल्यानंतर तिला मानसशास्त्राची बनावट पदवी घेतल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेलाही या महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

मार्चमधील सुनावणीत संजय राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी याचिकाकर्तीने केलेले आरोप फेटाळले होते.

Advertisement

याचिकाकर्ती राऊत यांची फॅमिली फ्रेंड असून, त्यांना मुलीसारखी आहे, असे राऊत यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते.