file photo

मुंबईः शिवेसेनेचा एक एक नेता एकामागून एक अडचणीत येत असताना आता खासदार संजय राऊत यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांची न्यायलयाकडून दखल घेण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तांना लक्ष घालण्याचे आदेश

मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेनेचे खासदार राऊत यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं प्रकरण आता राऊत यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.

कारण थेट न्यायालयानं याची दखल घेतली असून मुंबई पोलिस आयुक्तांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. तसंच २४ जून रोजी याप्रकरणाचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

सात वर्षांपासून छळ होत असल्याचा आरोप

राऊत यांच्या सांगण्यानुसार तक्रारदार महिलेवर पाळत ठेवल्याच्या आरोपाप्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांनी यात लक्ष घालून तक्रारीचं निवारण करावं आणि २४ जून रोजी यासंबंधिचा सद्य स्थितीचा अहवाल सादर करावा”, असं मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

राऊत गेल्या सात वर्षांपासून आपला छळ करत असून माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली होती, हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणं, शिवीगाळ करणं, धमक्या देणं असे अनेक गंभीर आरोप मुंबईतील एका मानसोपचार तज्ज्ञ महिलेनं केले आहेत.

राणे यांचा निशाणा

भाजपचे नेते नीलेश राणे यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी एक ट्वीट करुन राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. “न्यायलयानं संजय राऊतांच्या प्रकरणात दिलेले आदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो.

कारण माध्यमं हे वृत्त दाखवत नाहीत. संबंधित महिला गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊतांच्या जाचाला सामोरी जात आहे.

दोन आठवड्यांपूर्वी या महिलेला कोणतंही कारण नसताना अटक देखील करण्यात आली होती. राऊतांची तिच्या आयुष्याची वाट लावली आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.