सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. (MPSC Results Announced!) त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे.

रोहन कुवर यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून तर मानसी पाटील यांनी मुलींमधून प्रथम कमांक पटकावला आहे. एसईबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. आरक्षणाबाबत निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापूर्वी घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करू नये. तसेच नवीन पदांसाठी भरती करू नये,अशी भूमिका विविध स्तरावरून मांडण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने भरती प्रक्रियेबाबत अध्यादेश प्रसिध्द केला. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदे खुल्या पदांमध्ये रुपांतरित करण्यात आली. त्यानुसार 420 पदांचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता.

10 सप्टेंबर पुर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यां वतीनं देण्यात आल्यानंतर आयोगानं निकालाविषयी भूमिका जाहीर केली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात यासाठी पत्र दिलं होतं. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, या 413 पदांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या आता निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Advertisement