गेल्या आटवड्यात पुण्यात चार गुंडांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, राजगुरूनगर पाठोपाठ आता पुरंदर तालुकाही गुंडाच्या हत्येनं हादरला आहे. नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून हत्या केली.

गोळीबारानंतर हल्लेखोर फरार

गणेश रासकर याच्यावर गोळीबार करण्याची घटना संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेला. त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली.

नेमकं काय घडलं ?

संबंधित घटनेची माहिती मिळताच नीरा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस आणि जेजुरी पोलिसचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गणेश विठ्ठल रासकर हा गुंड सायंकाळी सात वाजता नीरा येथील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील एस्टी स्टँडनजीक पल्सर गाडीवर आला होता.

या वेळी त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी फरार झाले.

रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित

गणेश रासकर याच्या डोक्याच्या मागच्या भागात खोलवर जखम झाली. त्याला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं. त्यानंतर पुढील सोपस्करासाठी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे.