मुंबई : रिझर्व्ह बॅकेचं कार्यालय, हीरे बाजार, बिझनेस सेंटर मुंबईवरून हलविण्यात आल्यांनतर आता मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलविण्यात आलं असुन त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अदानींच्या हाती व्यवस्थापन
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन आता अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडकडे गेलं आहे. त्यानंतर विमानतळाचं मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवण्याचा निर्णय अदानी समूहानं घेतला आहे.

त्यावरून आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणं हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

Advertisement

मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जातं. मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या सात वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे.

जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेले. महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी जीव्हीके या या आंध्र प्रदेशच्या कंपनीकडे होते. त्यांनी मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्र प्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही, असा जोरदार टोला सावंत यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही भाजपला इशारा दिला. राऊत म्हणाले, की ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. मुंबई विमानतळाचे महत्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचे महत्व वाढावा.

Advertisement

आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. शिवसेना हे सहन करणार नाही. मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील, यासाठी शिवसेना आक्रमक राहील, असा इशारा राऊत यांनी दिला.