अतिमुसळधार पावसामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातही मुंबईप्रमाणे वॉररूम उभी राहणार आहे. यासाठी नुकतीच सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

सल्लागाराकडून ‘डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट’ (डीपीआर) प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात होईल. त्यानुसार पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अद्ययावत करण्यात येईल.

अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा

हवामानात होत असलेल्या बदलामुळे अचानक मोठा पाऊस, नाले, नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुण्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारली जाईल.

Advertisement

मुंबईत जाऊन वाॅररूमची पाहणी

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाची पाहणी केली. याठिकाणी कामकाज कसे चालते, याची त्यांनी माहिती घेतली. त्या धर्तीवर पुण्यात यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.

पुण्यात शेतीचे प्रचंड नुकसान

पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेत पिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजन देशमुख यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, मावळ मुळशी पश्चिम घाट माथ्यावर तुफान पाऊस झाला होता. अतितीव्र पावसामुळे मावळ भागातील भात पिके तसेच जमिनीचे बांध फुटणे, जमीन खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले.