Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मुंबईकरांची दिवाळीपूर्वी निर्बंध हटण्याची शक्यता कमी

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस व्हेरिएंटचा वाढलेला प्रभाव आणि महिनाभरात येणारी तिसरी लाट यामुळं मुंबईवरचे निर्बंध आणखीच कडक करण्यात आले असून दिवाळीपर्यंत तरी निर्बंध हटण्याची शक्यता कमीच आहे.

निर्बंध कायम

कोरोना रुग्णवाढीचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाला असला तरी, कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका लक्षात घेऊन, महापालिका आयुक्त निर्बंध उठवण्यास तयार नाहीत. 28 जूनला मुंबईतील निर्बंध शिथील होतील असे वाटत होते;

परंतु पालिका आयुक्तांनी शुक्रवारी पुन्हा परिपत्रक काढून मुंबईत तिस-या टप्प्यातील निर्बंध कायम राहतील, असे स्पष्ट केले आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज

जगभरातील तब्बल 85 देशांमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने मुंबई महानगरपालिकेचे टेन्शन वाढले आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता असल्यामुळे महापालिकेने आपली आरोग्य यंत्रणाही सज्ज ठेवली आहे.

त्यामुळे मुंबईतील निर्बंध शिथील करण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल फारसे तयार नसल्याचे समजते. मुंबई अनलाॅकच्या पहिल्या टप्प्यात दोन आठवड्यांपूर्वीच गेली आहे.

त्यामुळे ठाणे शहराप्रमाणे मुंबईतील व्यवहार सुरळीत सुरू होतील, असे बोलले जात होते; पण पालिका आयुक्तांनी निर्बंध शिथिल करण्यास नकार दिला.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी

मुंबईत 27 जूनपर्यंत अनलाॅकच्या तिस-या टप्प्यातील निर्बंध कायम राहतील, असे महापालिका आयुक्तांनी आठवड्याभरापूर्वी परिपत्रक काढून जाहीर केले होते.

28 जूनपासून मुंबईतील निर्बंध शिथील करण्यासंदर्भात 25 जूनला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता;

पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात तिस-या टप्प्यातील निर्बंध पाळण्याचे आदेश दिले. त्यामुळे पालिका आयुक्तांनीही निर्बंध शिथील करण्याचा निर्णय पुढे ढकलला.

Leave a comment