खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांतील नाराजीचा सूर कायम आहे. आतापर्यंत ७७ पदाधिका-यांनी राजीनामे देलि असून, अजूनही राजीनामे देण्याचे सत्र सुरूच आहे.
भटक्या विमुक्त आघाडीच्या सरचिटणीसांचा राजीनामा
मुंडे यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्यामुळे त्यांना डावलल्या जात असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. याच भावनेपोटी मुंडे भगिनी समर्थक राजीनामे देत आहेत.
अजूनही महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून भाजपचे पदाधिकारी आपल्या वरिष्ठांकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सोपवत आहेत.
आता नवी मुंबईतील भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस आदिनाथ डमाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
डावलल्याची भावना
मुंडे भगिनींना डावलले जात असल्याची भावना या समर्थकांमध्ये आहे. याच नाराजीतून अहमदनगर तसेच बीड जिल्ह्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजीचे सूर असून आणखी राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.
नवे मंत्री कराड यांची पंकजा यांच्यांशी चर्चा
पंकजा मुंडे समर्थकांची केंद्रात नव्यानं समाविष्ट झालेल्या डाॅ. भागवत कराड यांच्यावरही नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर कराड यांनी दिल्लीत पंकजा यांची भेट घेतली.
गोपीनाथ मुंडे हेच आपले नेते असून, त्यांच्या आठवणींना पंकजा यांच्या भेटीत उजाळा दिल्याचं कराड यांनी म्हटलं आहे.