Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महापालिकेला लाज वाटायला हवी होतीः ऊर्जामंत्री

आंबील ओढ्याच्या ठिकाणी घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. कोरोना काळात प्रशासनाने जी कारवाई केली, त्याबाबत महापालिकेला लाज वाटली पाहिजे होती. एवढं सगळं होत असताना महापौर काय झोपले होते का?

नागपुरात जर असं घडलं असतं, तर आपण जेसीबीखाली झोपलो असतो, अशा शब्दांत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महापालिका आणि महापाैर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली.

दलितांवरील अन्यायाची व्हावी चाैकशी

पुण्यातील आंबील ओढा परिसरातील नागरिकांच्या अनेक घरांवर बुलडोझर चालल्यानंतर राऊत यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत त्याच्या घरांवर झालेल्या कारवाईची माहिती घेतली.

परिसरातील अबालवृद्ध आणि महिलांशी संवाद साधला. दलित महिलांशी करण्यात आलेलं गैरवर्तन ऐकून तीव्र दु:ख झालं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुणे महापालिका आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावरही राऊत यांनी जोरदार निशाणा साधला.

दलित समाजावर अन्याय झाला आहे. घटनेची चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी आमच्या स्त्रियांना हात लावला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

अजित पवारांवरील आरोपाबाबत राऊत निरुत्तर

दरम्यान, स्थानिकांकडून अजित पवार यांच्या जवळच्या बिल्डरकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत असल्याबाबत पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला.

त्यावर राऊत यांना उत्तर देता आलं नाही. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.

Leave a comment