Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

टाटा मोटर्सला महापालिकेची नोटीस

महानगरपालिकेने पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करून घेतला, त्यात 19 हजार 648 इमारती, मालमत्ता अनधिकृत असल्याचं पालिकेच्या लक्षात आलं आहे.

अनधिकृत मिळकती, इमारतींच्या मालकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून मालमत्ता करासह इतर कर वसूल करण्याचं काम महापालिकेने सुरू केलं आहे. टाटा मोटर्सला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

टाटांकडून दोनशे कोटींचे येणे

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत असलेल्या टेल्को रोडवरील टाटा मोटर्स उद्योग समूहाच्या प्लांटमध्ये अनेक अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत.

या इमारतींच्या करापोटी टाटा मोटर्सने महापालिकेला दोनशे कोटी रुपये देणं अपेक्षित असून या संदर्भात पालिकेने टाटा मोटर्सला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

परवानगी न घेता विविध बांधकामे

या 19 हजार 648 इमारतींतून करापोटी पालिकेला 350 कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे. ही कराची थकबाकी मिळवण्यासाठी पालिकेच्या कर वसूली विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

टाटा मोटर्स कंपनीने त्यांच्या आवारात 2008 ते 2016 या काळात आठ हेक्टर क्षेत्रात सर्व्हिस सेंटर, कँटिन, कार पार्किंग शेड व इतर शेड्स तसंच इमारती उभारल्या आहेत आणि त्यांची नोंदणी महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे केलेली नाही.

कंपनीने पालिकेत सादर केलेल्या कागदपत्रांतून पालिकेला या अनधिकृत मालमत्तेची माहिती मिळाली. त्यामुळे पालिकेने टाटा मोटर्स कंपनीला 200 कोटी रुपयांचा थकित कर भरण्याचे आदेश देणारी नोटीस बजावली आहे.

महापालिकेच्या अधिका-यांना आत येण्यास मज्जाव

टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या आवारात येण्यास परवानगी नाकारली, त्यामुळे कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारेच आम्ही या अनधिकृत मालमत्ता गृहित धरल्या असून त्याच्या थकित करापोटी नोटीस बजावली आहे, अशी माहिती मालमत्ता विभागाच्या अधिका-यांनी दिली.

 

Leave a comment