कोरोनामुळं बसच्या संख्येत कपात करण्यात आली, तसेच रात्री पुरेशा बस नसल्यामुळे एखाद्याचा जीव जाईल, याची कुणी कल्पना केली नसेल; परंतु पुण्यात तसा अनुभव आला आहे. बस न मिळाल्याने स्थानकावरतच झोपलेल्या एका गरीबाचा खून झाला.
चोरीच्या उद्देशाने हत्या
मुंबईला जाण्यासाठी बस न मिळाल्यानं बसस्टॉपवर झोपलेल्या एका प्रवाशाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.
चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे.
हाॅटेलमध्ये होते कामाला
संजय बाबू कदम असं हत्या झालेल्या 35 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते घाटकोपर येथील रहिवासी आहेत. कदम हे शिरुर तालुक्यातील आंबेगाव याठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करतात.
सोमवारी ते आपल्या घरी मुंबईला चालले होते; पण रात्री उशीर झाल्यानं त्यांना बस मिळाली नाही. त्यामुळे रात्रीचा मुक्काम बसस्टॉपवरच काढायचा त्यांनी ठरवलं.
ते साधू वासवाणी चौकातून अंलकार चित्रपटगृहाकडे जाणा-या रस्त्यावरील विजय सेल्स या दुकानासमोरील बस स्टॉपवर झोपले होते.
दांड्यानं केली मारहाण
मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यावर धारदार शस्त्रानं वार करत, त्यांची हत्या केली आहे.
संजय कदम यांच्या खिशात एका मोबाईल नंबर आढळून आला होता. त्यावर संपर्क साधला असता मृताची ओळख पटली.