मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या बॉडीवरून (Rayat Shikshan Sanstha) राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्येच शाब्दिक वॉर चालू झाले आहे. शिवसेनेच्या नेत्याने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.

कोरेगावचे शिवसेना (Shivsena) आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. याच टीकेला प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिले आहे.

उदयनराजेंना (Udayanraje) रयत शिक्षण संस्थेच्या बॉडीवर घ्यावे आणि शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडावे अशी टीका शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली होती.

Advertisement

या शिक्षण संस्थेचे खासगीकरण होऊ नये, पात्र नसलेल्यांना बॉडीवर घेतल्याचे दु:ख वाटते असेही ते म्हणाले होते. शिवाय माझी उंची ६ फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा २ इंचाने मोठी आहे असेही महेश शिंदे म्हणाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महेश शिंदे याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पवार साहेबांवर टीका केल्याने काहीजणांना आपण कर्तृत्ववान असल्याचे वाटते.

यामुळे टीव्ही, वृत्तपत्रात नावे यायला सुरुवात होते. कुठल्या गावचे, कोण महेश शिंदे, त्यांची गौरी शंकर नावाची शिक्षण संस्था आहे. मदन जगताप यांच्यासोबत ५० टक्के पार्टनरशिप असलेल्या या संस्थेची अवस्था काय आहे?

Advertisement

क्लार्क, प्रोफेसरना पगार नाही, विद्यार्थ्यांच्या फीबद्दल माहिती नाही. तुम्ही घेतलेल्या साखर कारखान्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी विचारले आहेत.

रयत शिक्षण संस्था ज्या उद्देशाने उभारली. बहुजनांच्या हितासाठी त्याची जशी वाढ झाली त्यापद्धतीने पाळेमुळे खेड्यात पोहोचवली त्यामागे पवार आहेत. ज्या माणसाबद्दल आपण बोलतोय त्याच्यासमोर आपले कर्तृत्व किती हे तरी तपासा.

बोलायला तुम्ही कितीही बोलू शकता, कोण अडवणार, तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही, स्वत:ची लाज स्वत:च्या हाताने घालवू नका.

Advertisement

तुम्ही उंचीने किती आहात याबद्दल काही प्रश्न नाही, पण मेंदु कुठे आहे हे तपासून पाहा असा खोचक टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी महेश शिंदेंना लगावला आहे.