मोक्याच्या ठिकाणी असणारे व्यापारी गाळे मिळवण्यासाठी येथे काही लोकांनी हातात नंग्या तलवारी घेत धुमाकूळ घातला.

गाळे देण्यास नकार दिल्यानंतर या लोकांनी तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यात एक जण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

गंभीर जखमीला सोलापूरला हलविले

चौकातील गाळ्यांच्या वादातून तिघांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना इंदापुरात घडली. या हल्ल्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरमध्ये हलवण्यात आले आहे.

Advertisement

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बाभुळगावात 11 जुलै रोजी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दहशत माजविण्याचा प्रयत्न

दिवसाढवळ्या हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी सध्या फरार आहेत.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार बाभुळगावचे उपसरपंच नागनाथ भिवा गुरगुडे, सरपंच महिलेचे पती सोमनाथ जावळे यांच्यासह आणखी सात जणांनी तलावरीचा धाक दाखवत दुकानदारास धमकावण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

तसेच गावातील मोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे आम्हाला दे, नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकीसुद्धा फिर्यादी दत्तात्रोय उंबरे यांना दिली.

असे धमकावूनसुद्धा गाळे देण्यास नकार दिल्यानंतर नऊ जणांनी उंबरे कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश

दरम्यान या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र विशेष बाब म्हणजे ही घटना होऊन दोन दिवस झाले तरी अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तसेच पोलिस या घटनेसंदर्भात बोलण्यासही टाळाटाळ करीत आहेत.

Advertisement