Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

थांब रे मध्ये बोलू नकोः राणे यांचा ‘या’ नेत्याला दम!

चिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे फटकळ आहे. ते कधीही कोणाचा पाणउतारा करतात. स्वकीयांचीही ते भीड बाळगत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणा-या राणे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच एकेरी उल्लेख करीत, त्यांना मध्ये मध्ये न बोलण्याची समज दिली.

दरेकर यांनाही राणे यांनी केले गप्प

 राणे यांनी नुकताच फडणवीस आणि दरेकर यांच्या साथीने पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. या वेळी राणे अधिकाऱ्यांना झापत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात मध्ये बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरेकर यांनाही राणे यांनी गप्प केलं. “थांब रे मध्ये बोलू नको” असं राणे दरेकर यांना सांगत  असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. राणे यांनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांसमक्ष गप्प राहण्याची सूचना केल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अधिकाऱ्यांना झापले

राणे हे दरेकर आणि फडणवीस यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते. त्या वेळी दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी थांबवल्याचा अंदाज आहे.

राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांवर संताप

याआधी, राणे यांनी आपल्या दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित नसल्यानं संताप व्यक्त केला होता. राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”

Leave a comment