विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून जी नावे चर्चेत आहेत, ती राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने दबावाचे राजकारण सुरू केले आहे. सोईचा अध्यक्ष व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे.
थोपटे यांचे नाव चर्चेत
महाविकास आघाडी सरकारमध्ये पदवाटपाचं जे सूत्र ठरलय, त्यानुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे येणार आहे; पण काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.
सध्यातरी काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्यावेळी मंत्रिपदाची त्यांची संधी हुकली होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती होऊ शकते.
थोपटे, चव्हाण यांचे पवार यांच्याशी नाही सख्य
थोपटे यांच्याप्रमाणेच काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही विधनासभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे;पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही नावांना विरोध होऊ शकते.
कारण संग्राम थोपटे यांचं पूर्वीपासून पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर फारसं सख्य नाही. दुसऱ्या बाजूला चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही नावाना राष्ट्रवादीकडून समर्थन मिळण्याची शक्यता कमी दिसते.
राष्ट्रवादीचा अध्याप पक्षादेश नाही
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक लक्षात घेऊन शिवसेना, काँग्रेसकडून पक्षादेश जारी करण्यात आला आहे; पण राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अद्याप पक्षादेश बजावलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षादेश न बजावल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या मर्जीतील अध्यक्ष हवा आहे का? राष्ट्रवादी अजूनही तटस्थ का? अशी चर्चा सुरू झाली.