मुंबई – यंदाच्या नवरात्रोत्सवात (navratri) १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन

सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, २ दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी (navratri) सोमवार, ३ ऑक्टोबर आणि मंगळवार, ४ ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, १ ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.