स्थानिक स्वराज्य संस्थातील सत्तेसाठी राज्य सरकार कधी नियमांत बदल करते, कधी सोईची प्रभाग रचना करते, तर कधी अधिक गावे सामावून घेते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही २३ गावे पुणे महापालिकेत सामावून घेऊन सत्तेसाठी व्यूहरचना केली आहे.
नगरसेवकांची संख्या कायम
महापालिकेतील गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर भोवतालच्या गावांचा समावेश महापालिकेत करून घेतला आहे.
आधीची ११ व आता नव्याने समाविष्ट झालेली २३ अशा ३४ गावांमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय वर्चस्व पाहता हीच एक बाब प्रामुख्याने दिसते आहे.
महापालिका क्षेत्र निश्चित करण्याच्या नियमाप्रमाणे महापालिकेसाठी ३० लाख लोकसंख्येला १६० नगरसेवक व त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येला एक नगरसेवक मिळतो. यानुसार समाविष्ट ३४ गावांमुळे लोकसंख्येत फारशी वाढ होणार नाही.
२०११ च्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्येतील वाढ फार तर पाच लाख असेल. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत फार वाढ होणार नाही. आधीच्या ११ गावांना मिळून फक्त दोन नगरसेवक मिळाले यावरून ते स्पष्ट होते.
प्रभाग रचना नव्याने
आता समाविष्ट गावांमुळे प्रभाग रचना नव्याने करावी लागणार आहे. त्यात ही गावे त्यांच्या लगतच्या प्रभागांमध्ये मिसळून जातील. त्याशिवाय आता चारचा प्रभाग नसून एक प्रभाग एक नगरसेवक अशी रचना असेल असे सांगितले जाते.
त्यातून मतदानावर निश्चितपणे फरक पडणार आहे. त्याच विचारांमधून राजकीय फायदा देणारा हा निर्णय त्वरित घेण्यात आला असल्याची चर्चा आहे.
फडणवीस सरकारचा होता विरोध
या आधीच्या फडणवीस सरकारकडून याच कारणाने हा निर्णय लांबणीवर टाकला जात होता; मात्र भाजप वगळता काँग्रेससह अन्य पक्षीयांच्या हवेली तालुका कृती समितीने न्यायालयात दावा दाखल केला.
निकालात सरकारला गावांना समाविष्ट करून घेण्याचा आदेश देण्यात आला, तरीही त्यांनी अकराच गावे घेतली होती. आता राज्यात सत्ता आल्यावर राष्ट्रवादीने लगेचच सर्व गावे सामील करून घेतली आहेत.