राज्यात सध्या सत्तेतील तीनही पक्षांत कुरबुरी सुरू असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करीत असलेली टीका आणि ईडीने आवळत आणलेला फास या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वारंवार अचानक भेटी होत आहेत.

आताही तातडीची भेट झाल्याने त्यात काय झाले, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राजकीय घडामोडीत महत्त्वाची भेट

महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

राज्यातील आणि राजधानी दिल्लीतील गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

अर्धा तास चर्चा

पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र: वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर बैठक झाली. त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्यासोबत पवार यांची बैठक झाली.

या बैठकांनंतर काही वेळातच पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले.

साधारण अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून या चर्चेचा तपशील मिळाला नसला तरी ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.

चौकशांना सामोरे जाण्याची व्यूहनीती

केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर सध्या राज्यातील महाविकास आघाडीचे काही नेते आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर खडसे यांच्यावरही चौकशीची टांगती तलवार आहे. या स्थितीला कसं सामोरं जायचं हा आघाडीसाठी कळीचा प्रश्न बनला आहे.

त्यासोबत महाविकास आघाडीतही गेले काही दिवस तणाव दिसत आहे. पटोले यांनी स्वबळाची घोषणा करताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घ्यायची हासुद्धा प्रश्न आहे. त्यामुळेच पवार आणि ठाकरे यांच्यातील आजच्या भेटीने उत्सुकता ताणली गेली आहे.

कळीच्या मुद्यावर चर्चा

राज्यात सद्यस्थितीत जे कळीचे मुद्दे आहेत त्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून चर्चेचा तपशील मात्र मिळालेला नाही. शरद पवार हे दिल्लीला रवाना होत असून त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

राष्ट्रीय स्तरावर एक भक्कम आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे सक्रिय आहेत.

त्यांनी पवार यांच्यासोबतच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली आहे. त्याअनुषंगानेही पवार हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलले असावेत, असे सांगण्यात येत आहे.