पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर बाह्यवळण रस्त्याच्या उद्घाटनावरून खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद थांबण्याची चिन्हं नाहीत.

हा वाद एवढा शिगेला पोहचला, की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं. या दोघांमधला वाद सरकारवर परिणाम करतो का, याची चर्चा सुरू झाली आहे.

नेमका वाद काय ?

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते; मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं.

Advertisement

हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमिपूजन केलं होतं. कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

आढळरावांचा दावा काय ?

खासदार डॉ. कोल्हे यांच्यावर आढळराव पाटील यांनी कुरघोडी केली आहे. खेड घाट बायपासच्या कामाच्या श्रेयाची चोरी करून वचनपूर्ती करण्याचं थोतांड केल्याचा आरोप आढळराव पाटील यांनी केला.

त्यांनी शिवसैनिकांसमवेत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला. खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले होते, त्या वेळी आपण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज अखेर बाह्यवळणाचे काम झालं आहे.

Advertisement

अशा वेळी अचानक उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला. या कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत, असा आरोप आढळराव पाटील यांनी केला.

 

Advertisement