मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता विविध नेते ऐरणीवर आणीत आहेत. आता आमदार नीतेश राणेही या लढ्यात उतरले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
मराठा आरक्षणावर संवाद आणि चर्चा
तुळापूर (ता. हवेली) येथे शौर्यपीठावर मराठा आरक्षणावर संवाद आणि चर्चा आयोजित केली होती. या वेळी आमदार राणे बोलत होते. या वेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रम पाटील, उपाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील आदी उपस्थित होते.
आरक्षणाचा केंद्राशी संबंधव येतो कुठे ?
मराठा समाजाचे आरक्षण सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे न्यायालयात टिकले नाही. त्यांच्या चुका टाळून ते आता केंद्राकडे बोट दाखवत आहेत. केंद्र सरकारचा संबंध येतो कुठे? आघाडी सरकार नुसते कारणे देत असून, ते आरक्षण देऊ शकत नाही. आता मूक मोर्चे काढून जमणार नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मृगजळासारखे
राणे म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे राज्यातून निघाल्यानंतर आरक्षाण मिळाले नाही. चर्चा बैठका- आश्वासने खूप झाली. मुख्यमंत्री तर काही कामाचे नाहीत. त्याचे आश्वासन मृगजळ ठरत आहेत. उठ-सूट केंद्राकडे बोट दाखवून महाराष्ट्र सरकार रडायला लागले आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला पहिल्या नंबरात आघाडी सरकारणे बसविले आहे.
आरक्षण मिळाले नाही, तर मंत्र्यांना फिरू देणार नाही
मराठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शेतकरी कर्जमाफी, शिवस्मारक, अण्णासाहेब पाटील महामंडळ पुनर्जीवित करणे, सारथीला मदत या चर्चा आता बास झाल्या. आता फक्त आरक्षण पाहिजे. मराठा समाजावर कोणीही बोलतो, लिहितो काय चाललेय हे? आरक्षण मिळाले नाही, तर एकही मंत्री रस्त्यावर फिरणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला.