पुणे – पुणे (pune) आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain news) पडत आहे. अशाच प्रकारचा पाऊस अनेक वेळा पडल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांना नुकतेच एक सविस्तर निवेदन दिले होते. याची अंमलबजावणी झाली असती तर पुणेकरांवर अक्षरशः पोहत जाण्याची वेळ आली नसती असे देखील डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

पुण्यात होणारा पाऊस मुंबईच्या (Rain news) तुलनेत कमी प्रमाणात होता तरी देखील पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.आधीच सुरु असलेली पुणे मेट्रोची कामे आणि त्यात झालेल्या पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता.

नाला सफाई तसेच रस्त्यावर पाणी साचू नये यासाठीही उपाय योजना पावसाळ्या पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते पण ते झालेले दिसत नाही. पाणी साचल्याने शहरभरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यात पुणे मनपाचे शून्य नियोजन पाहायला मिळाले.

शहरातील अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. सोबतच छोटे-मोठे नालेही भरून वाहू लागले. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे कोरेगाव पार्क, डेक्कन व इतर परिसरामध्ये हाहाकार उडाला होता.

पावसात शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, जंगली महाराज, रस्ता, टिळक रस्ता, आपटे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होते.
अतिवृष्टीमुळे पुन्हा रस्त्यावर पाणी साठू नये यासाठी

◆  १४ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोसायटीचे तसेच वाहनांचे नुकसान झालेले आहे. त्याखेरीज प्रत्येकाच्या घरामधली किंवा दुकानांमध्ये विविध साहित्याचे तसेच कागदपत्रांचे सुद्धा नुकसान झालेले आहे.

तरी सदरील पत्राच्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे की इन्शुरन्स मधून याचे नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात इन्शुरन्स कंपन्यांशी बोलावे व लोकांना इन्शुरन्सचे पैसे मिळवून द्यावे. यामुळे लोकांना खूप दिलासा मिळेल. तसेच सानुग्रह अनुदानातून आर्थिक मदत देण्यात यावे.

◆  यापूर्वी पण असेच नुकसान झाले होते. त्याबद्दल पूर्वीच्या काळामधलं काही निर्णय असेल तर त्याचाही अभ्यास करावा. प्रत्येक पावसामध्ये जे हजारो वाहनधारकांचे त्याचबरोबर खालच्या मजल्यावर पाणी घुसल्यामुळे जे नुकसान होत आहे त्याबाबत सविस्तर नुकसानभरपाई बाबत निर्णय घ्यावा.

◆  ऊर्जा विभागानेही सिग्नल चा वीजपुरवठा कां खंडित झाला याच्याबद्दलचा एक अहवाल आपल्याकडे त्वरित सदर करावा अशा सूचना द्याव्यात.

◆  सदरील सखल भागात पावसाचे पाणी साचत असल्याने या ठिकाणी पाणी साठविण्यासाठी अंडरग्राउंड टॅंक तयार करण्यात यावेत. हे टँक भरल्यानंतर स्वतंत्र पंपिंग मशिनरी द्वारे पाणी उचलावे. अथवा तात्पुरते टँक उभारावेत.

◆  त्याचबरोबर पाऊस पडल्यानंतर शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल बंद पडतात यासाठी पुणे मनपा आणि ट्रॅफिक विभागानी नवीन तंत्रज्ञान वापरून सिग्नल बंद पडणार नाहीत हे पहावे.

◆  तसेच पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडी वाढत आहे. शहरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, मेट्रो, रेल्वे, एसटी, पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी),

स्मार्ट सिटी आदी विविध शासकीय विभागांचे वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्यात समन्वय निर्माण करून शहराचा एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारने “उमटा’कडे सोपविली होती.

या आराखड्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, ही सूचना सदरील पत्राच्या माध्यमातून डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांना केली आहे.