file photo

मुंबई/पुणे: मानवांत जसे नवनवीन रोग आढळतात. तसेच आता ते प्राण्यातही आढळायला लागले आहेत. वटवाघुळात कधीच न आढळणारा रोग प्रथमच आढळला आहे. ही महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बाब आहे.

माणसामध्येही संक्रमित

राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबद्दलचं संशोधन केलं आहे.

निपाह विषाणू असलेल्या वटवाघळांच्या प्रजाती साताऱ्यातल्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आल्या.

याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता, अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली.

देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो.

धोकादायक विषाणू

निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो. निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. निपाह विषाणूची लागण झाल्यानंतरचा मृत्यूदर खूप जास्त आहे. निपाहवर औषध उपलब्ध नसल्यानं मृत्यूदर तब्बल ६५ टक्क्यांच्या पुढे आहे.

कोरोनाचं मूळ वटवाघळांमध्येच

गेल्या काही वर्षांपासून वटवाघळांमुळे विषाणू पसरत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. इबोला, मारबर्ग यासारखे विषाणू वटवाघुळांमुळेच पसरले होते. कोरोना विषाणूच मूळदेखील वटवाघळांमध्येच असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

निपाह विषाणूचा सर्वप्रथम १९९८-९९ साली मलेशियात आढळून आला. डुकरं आणि डुकरांची काळजी घेणाऱ्यांमध्ये तेव्हा हा विषाणू आढळून आला.

त्या वेळी मृत्यूदर ४० टक्के होता. २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत निपाह आढळला. यानंतर २००७ मध्ये पश्चिम बंगालच्याच नाडिया जिल्ह्यात निपाह आढळला.

२०१८ मध्ये केरळच्या कोझिकोडेत निपाहमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा कोझिकोडेत निपाह आढळून आला.