प्रथा, परंपंरा कशा जीवघेण्या ठरतात आणि त्या एखाद्याशी जीवाशी कशा बेतू शकतात, याचं उदाहरण दौंड मध्ये पाहायला मिळाले. अशा प्रथेमुळे नवजात बाळाचा जीव जाता जाता वाचला.

जिभेला लावलेली अंगठी बाळानं गिळली

प्रसुती वेदना सुरू झाल्या.. नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नव्हतं, म्हणून सिझेरियन केलं. गोंडस मुलाचा जन्म झाला. सगळं घरच बाळाच्या कौतुकात रमलं होतं. त्याचं लाड करण्यासाठी काय करू आणि काय नको अशीच स्थिती झाली होती.

दरम्यान, नवजात बाळाच्या ओठाला, जिभेला सोनं लावण्याची प्रथा काही ठिकामी आहे. त्यासाठी नातेवाइक महिलांनी एक ग्रॅम सोन्याची अंगठी जिभेला लावली. त्या वेळी बाळाने ती अंगठी गिळली; मात्र कुणाच्याच लक्षात ही बाब आली नाही.

Advertisement

पोटात आढळली अंगठी

अंगठी दिसेना म्हणून शोध घेतला; पण सापडली नाही. तेव्हा बाळाने गिळली अशी शंका आली आणि त्याचा एक्सरे काढला. तेव्हा बाळाच्या पोटात अंगठी असल्याचं दिसलं. त्यानंतर तातडीनं बाळाला पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे पाठवले.

तेथे डॉ. कांचनकुमार यांनी प्राथमिक तपासणी करून रुबी हॉल दवाखान्यात दाखल करून घेतले. डॉ. किरण धनंजय शिंदे (मेडिकल ग्रॅस्ट्रो एनटोरोलॉजिस्ट अँड एंडोस्कोपी तज्ञ) यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे अंगठी काढण्याचे ठरवले.

आनंदाची जागा घेतली भीतीने

केडगाव ( ता. दौंड ) येथील पल्लवी रोहित शेळके यांची एका खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. जन्म झाल्यानंतर काही तासातच मुलाच्या पोटात अंगठी गेल्यानं नातेवाइकांच्या आनंदाची जागा मोठ्या काळजीने घेतली.

Advertisement

मात्र वेळेत ही बाब लक्षात आल्यानं आणि डॉक्टरांच्या उपचारामुळे अंगठी काढण्यात आणि बाळाचा जीव वाचवण्यात यश आलं. अवघ्या काही तासांच्या बाळाच्या जीवाला रिंगमुळे धोका उद्भवू शकत होता.

टोकदार रिंगमुळे आतड्याला इजा होण्याची दाट शक्यता होती या सर्व गोष्टी विचारात घेवून नातेवाइकांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्यात आले. डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून नातेवाइकांनी परवानगी दिली.

भूलतज्ञ डॉक्टर नंदिनी लोंढे यांनी अत्यंत कौशल्याने बाळाला पूर्ण भूल दिली. डॉक्टर किरण शिदे पाटील यांनी अतिशय सावधगिरीने आपले सर्व कौशल्य पणाला लावून डॉ नंदिनी लोंढे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अंगठी अलगदपणे पोटातून काढली.

Advertisement