कत्र काम करत असलेल्या मित्रांनी व गावातील तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडविले.वरुडे (ता.शिरुर) येथील संदीप दत्तात्रय रोकडे (वय ३६) यांचे नुकतेच निधन झाले. कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
ही माहिती त्यांच्या समवेत काम करणारे मित्र व ग्रामस्थांना समजताच त्यांनी दशक्रिया विधीच्या दिवशी केलेल्या आवाहनाला उपस्थित सर्वांनी प्रतिसाद देत सुमारे नऊ लाख रुपये जमा झाले. रोकडे हे रांजणगाव एमआयडीसीत कामाला होते.
आई वडील व भाऊ यांचे निधन झाल्यानंतर ते आपली पत्नी व दोन लहान मुलांसह आपली बहीण यांच्या फलकेमळा येथे घरी वास्तव्यास होते. महिनाभरापासून काळेवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना १ जून रोजी त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यावेळी रोकडे यांचे या रुग्णालयाचे सुमारे ८ लाख रुपये बिल झाले. रोकडे यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढे बिल कोठून भरायचे?असा प्रश्न नातेवाईकांपुढे निर्माण झाला.
त्यावेळी रोकडे यांचे भाचे सामाजिक कार्यकर्ते नयन फलके यांनी राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर व आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांच्याशी संपर्क साधला.
पाचुंदकर बंधूनी शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. कोल्हे यांनी तातडीने रुग्णालय व्यवस्थापकांशी संवाद साधला.
त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर,स्थानिक नगरसेवक धनंजय आल्हाट,शिवसेनेचे कार्यकर्ते सचिन भोसले व कुणाल तापकीर या सर्वांच्या माध्यमातून जवळपास ४ लक्ष रुपये बिल कमी केल्याने रोकडे यांच्या कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला.
त्यानंतर रोकडे यांच्या दशक्रियेच्या दिवशी त्यांचे मित्र, वरुडेचे सरपंच कानिफनाथ भरणे, सुरुची दूध डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक भैरवनाथ काळे, उपसरपंच पांडुरंग तांबे, ज्ञानेश्वर काळे,
पोलिस पाटील भाऊसाहेब शेवाळे व निलेश येवले यासह ग्रामस्थांनी केलेल्या आवाहनाला दशक्रिया विधीदिवशी उपस्थित सर्वांनी प्रतिसाद देत पाचशे रुपयांपासून ते सुमारे तीन लाख रुपयांपर्यंत अशी सुमारे नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा झाली.
ही सर्व रक्कम संदीप यांच्या दोन्ही मुलांच्या नावे कायमस्वरूपी मदत ठेव म्हणून कुटुंबाकडे सुपूर्द केली. दरम्यान,रोकडे कुटुंबाना करण्यात आलेल्या मदतीमुळे या कोरोनाच्या संकट काळात देखील माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा आला आहे.