file photo

नागपूर : इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी भाजपनं आज राज्यभर आंदोलन केलं. नागपूरमधील आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाग घेतला.

आपण सर्व मिळून ओबीसी आरक्षण परत आणू. त्यासाठी आमच्या हातात सूत्र द्या. ओबीसी आरक्षण परत आणलं नाहीतर राजकारणातून संन्यास घेईल, अशी मोठी घोषणा फडणवीस यांनी केली.

कोरोना आहे, तर निवडणुका होतात कशा?

मंत्रीच ओबीसी आरक्षणासाठी मोर्चे काढत होते. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली असती, तर ओबीसी आरक्षण कायम असतं.

आता कोरोनामुळे आणखी नवीन निर्बंध लावले. मग त्यामध्ये पाच जिल्ह्यांच्या निवडणुका होतातच कशा, असा सवाल त्यांनी केला.

ओबीसीला संविधानात भाजपमुळे जागा

ओबीसीला संविधानात भाजपने जागा दिली. ही जागा काँग्रेस, राष्ट्रवादीने दिली नाही. आम्ही ओबीसींसाठी वेगळं खातं तयार केलं. या आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत?

तर दोन जणांनी ओबीसी आरक्षणविरोधात याचिका केली. त्यापैकी वाशीममधल्या काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडाऱ्याचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मग ओबीसी आरक्षण रद्द करणारे हे काँग्रेस आहे, अशी टीका फडणवीसा यांनी केली.

सरकारमध्ये ओबीसी नेते चटणी, कोशिंबिरीसारखे

या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांची हालत म्हणजे एखाद्या ताटामध्ये चटणी आणि कोशिंबिर असते त्याचे जितके महत्व आहे, तितकंच महत्व ओबीसी नेत्यांचं आहे. यांचे षडयंत्रण आहे, ओबीसीला आरक्षणापासून वंचित ठेवायचे, असा आरोपही फडणवीस यांनी केला.