केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कडवट शब्दांत टीका केली. ‘‘इंजिन बदलण्याची गरज आहे. डबे बदलून काही उपयोग होणार नाही,’’ अशी संभावना करताना त्यांनी मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

महापालिका निवडणूक स्वबळावर

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसच्यावतीने केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पटोले पुण्यात आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही भाजपमुळेच निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा पक्षाचा विचार असून त्यादृष्टीने चाचपणी सुरू केल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Advertisement

विध्वसंक व्यवस्था उभी

पटोले म्हणाले, की इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली. त्याकडे लक्ष देण्याऐवजी देशात जातीपातीचे राजकारण करणारी विध्वंसक व्यवस्था उभी राहिली आहे. या अत्याचारी व्यवस्थेच्या त्रासाविरोधात काँगेसने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरू केले आहे.

काँग्रेसने देश उभा केला आणि यांनी देश बरबाद केला. राहुल गांधी यांनी नोटाबंदी, जीएसटीवर वेळोवेळी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली; परंतु त्यांची चेष्टा केली गेली.

कोरोनाबाबत ही त्यांनी सरकारला सूचित केले होते; परंतु त्याकडेही दुर्लक्ष केले. ते जे बोलत होते, ते आज खरे होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement

अध्यक्ष निवडीवरून वाद नाही

प्रदेश काँग्रेसमध्ये वाद नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयार करायचा अधिकार आहे.

दोन दिवसच राज्य विधिमंडळाचे अधिवेशन झाले. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड झाली नाही. विशेष अधिवेशन घेऊन ही निवड करता येईल, असे पटोले म्हणाले.

सीबीआय, ईडी चिल्लर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील ‘ईडी’च्या चौकशीबाबत पटोले म्हणाले, ‘‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या दोन्ही देशातील सर्वोच्च तपासणी यंत्रणा आहेत; परंतु भाजपने स्वत:च्या सोयीसाठी वापरून त्या चिल्लर केल्या आहेत.’’

Advertisement