मुंबईः कोरोनायोद्ध्या म्हणून सन्मान वाट्याला येत असला, तरी त्याने पोट भरत नाही. त्यामुळे सन्मान, मानापेक्षा पोटाची सोय करा, अशी मागणी करीत परिचारिका रस्त्यावर उतरल्या आहेत.

कामबंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारादेखील परिचारिकांनी दिला आहे.

ऐन कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे. गेले दोन दिवस परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केलं होतं;

Advertisement

पण त्यानंतरही राज्य सरकारकडून दखल न घेतली गेल्यानं परिचारिकांनी आता आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

प्रमुख मागण्या

आरोग्य विभागात परिचारिकांच्या कायमस्वरुपी पदभरती करा, केंद्राप्रमाणे जोखमी भत्ता, कोविड काळात ७ दिवस कर्तव्यकाळ आणि तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी,

कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक रजा पुन्हा सुरू करावी अशा काही प्रमुख मागण्यांसह परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

Advertisement

मुंबईतील जे जे रुग्णालयात आंदोलन

मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील ३७५ परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. याशिवाय सेंट जॉर्ज रुग्णालयातील १७५ आणि जीटी रुग्णालयातील १०० परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात आज गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे.