आज सांगून मोर्चा काढला, तर तुम्ही एवढी यंत्रणा उभी केली; पण मराठ्यांचा आवाज दाबला तर यदाकदाचित पुढचा मोर्चा न सांगता काढू.

तेव्हा सरकार आणि यंत्रणा काय करते ते पाहूच, असा इशारा माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिला. आता मराठा आक्रोश मोर्चा काढताना तारीख देणार नाही, थेट अॅटॅक करू, असा इशाराही त्यांनी दिला.

नक्षलवादी होऊ देऊ नका

पाटील यांच्या नेतृत्वात आज सोलापुरात प्रचंड मोठ्या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला हजारो मराठा तरूण सहभागी झाले होते.

Advertisement

या वेळी मोर्चकऱ्यांना संबोधित करताना पाटील यांनी हे आवाहन केलं. या पुढे प्रत्येक जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. त्यासाठी आता तारीख देणार नाही.

हे सरकार भविष्यात तुम्हाला अडचणीत आणू शकतं. त्यामुळे काळजी घ्या, असं सांगतानाच मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.

..तर स्वस्थ बसणार नाही

राज्यात काही मूक मोर्चे निघाले. सरकारने त्यांना परवानगी दिली; पण मराठा आक्रोश मोर्चाला विरोध केला जातोय. आमचे मोर्चे अडवले जात आहेत. आमच्या लोकांना जिल्ह्यात येऊ देत नाही. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फोर्स तैनात करण्यात आला आहे.

Advertisement

सातारा आणि सांगलीतून पोलिस मागवले आहेत. त्यामुळे मराठ्यांची ताकद किती आहे हे सरकारलाही कळून चुकले आहे, असं सांगतानाच स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सोलापूरच्या वेशीवर मराठा कार्यकर्त्यांना आणि महिलांना अडवण्यात आलं आहे. त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावं. नाही तर आम्ही जागचे हलणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

Advertisement

कार्यकर्त्यांची धरपकड

पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यासाठी संचारबंदी लागू असल्याचं आणि कोरोनाचं कारणही देण्यात आलं होतं; मात्र संचारबंदीचे आदेश झुगारून पाटील यांनी मोर्चा काढला.

संभाजी चौकात सकाळीच आंदोलक जमू लागले. त्यानंतर दुपारी ही गर्दी प्रचंड वाढल्याने आंदोलकांच्या घोषणाही दणाणू लागल्या. या वेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना सोलापूरच्या वेशीवर अडवले. काहींची धरपकड केली. त्यामुळे नरेंद्र पाटीलही संतप्त झाले होते.

 

Advertisement