मुंबईः भोसरीतील जमीन खरेदीप्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची ‘ईडी’कडून चाैकशी सुरू आहे. या जमीन खरेदी प्रकरणी खडसे यांना ‘क्लीन चिट’ देणारा न्या. दिनकर झोटींग समितीचा अहवाल सापडल्याने आता ईडीच्या कारवाईतून खडसे यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रालयातून गहाळ झाला होता अहवाल

गेल्या दीड वर्षांपासून गहाळ झालेला अहवाल अखेर सापडला आहे. हा अहवाल सापडल्याने खडसे यांना दिलासा मिळणार आहे. या अहवालावर पुढे काय कार्यवाही करायची, याचा निर्णय आघाडीचे नेते घेणार असल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिवांचे कार्यालय आणि सामान्य प्रशासन विभागाकडे झोटिंग समितीचा अहवाल मागितला होता; परंतु हा अहवाल सापडत नसल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी हा अहवाल शोधायला सांगितले होते.

Advertisement

अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार

हा अहवाल मिळाल्याने तो अहवाल ‘ईडी’पुढे सादर करून खडसे यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन झोटिंग समितीचा अहवाल सापडला असून तो मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याची माहिती दिली.

हे नेते घेणार खडसेंबाबत निर्णय

अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई एकत्र बसून आता खडसे यांच्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

चौकशी थांबणार?

पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप खडसे यांच्यावर झाल्याने त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. आता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) या प्रकरणाची चौकशी सुरू असून खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे.

Advertisement

शिवाय ईडीने खडसे यांचीही चौकशी सुरू केली आहे. नेमक्या याच वेळेला झोटिंग समितीचा अहवाल सापडल्याने या चौकशी प्रकरणात खडसे यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अहवाल सादर केला नाही

खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती नेमली होती. या समितीचा अहवाल ३० जून, २०१७ रोजी मुख्य सचिवांना सादर करण्यात आला होता.

हा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी खुद्द खडसे यांनी अनेकदा विधानसभेत केली होती; पण हा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला नव्हता

Advertisement