आगामी पंधरा दिवसात मान्सून दाखल होईल. पावसासोबत अनेक रोगराई शिरकाव करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
तर काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळाव्या लागणार आहेत. पावसाळा आला की अस्वच्छतेमुळे रोगराई झपाट्याने वाढते आणि बारीक-सारीक आजारांना निमंत्रण मिळते.
आणि सध्या कोरोनाच्या थैमानामुळे जास्तच सजग राहावे लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात काय काळजी घ्यावी ते आपण पाहूया.
– पावसात भिजणे शक्यतो टाळा आणि भिजल्यास कोरड्या टॉवेलनं अंग पुसून घ्या
– ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहू देऊ नका
– पावसातून बाहेरून घरात आल्यावर आधी पाय स्वच्छ कोरडे करावेत. तसेच ओले मोजे वापरू नयेत.
– पावसात भिजल्यास घरी आल्यावर प्रथम अंघोळ करून मगच कोरडे कपडे घालावेत.
– अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकल्यास त्वचेला होणारा जंतुसंसर्ग काही प्रमाणात टाळता येतो.
– केस व कपडे ओले असताना वातानुकूलित जागेमध्ये जाण्याचे टाळावे. त्यामुळे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला असे आजार होण्याची शक्यता असते.
– डास निर्मूलनासाठी विविध उपाययोजना कराव्यात.
– नियमितपणे अंगाला तिळाचे तेल कोमट करून लावावे.
– भेळपुरी, पाणीपुरी, भजी, सॅंडविच इत्यादी बाहेरचे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे.
– तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
– मांसाहार करणाऱ्यांनी या काळामध्ये मासे खाणे टाळावे, कारण हा माशांचा प्रजोत्पादनाचा मोसम असतो, त्यामुळे पचनसंस्थेला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.
– कोणत्याही प्रकारचे कच्चे अन्नपदार्थ आणि कापून ठेवलेली फळे खाणे टाळावे कारण या अन्नपदार्थांमधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. या काळात पचनशक्ती आधीच मंद असते आणि हे अन्नपदार्थ पचायला जड असतात.
– आंबट, शीत पदार्थ टाळावेत.
– आहारामध्ये आले, गवती चहा इत्यादी पदार्थ असावेत.
– प्यायचे पाणी शुद्ध करण्यासाठी water प्युरिफायरचा वापर करावा. ते शक्य नसल्यास पाणी गाळून उकळवून मगच पिण्यासाठी वापरावे.
– अन्नपचन नीट व्हावे, यासाठी या काळात भरपूर पाणी पिणे योग्य ठरते.
– बाहेर पाणी पिणे शक्यतो टाळावे. बाहेर पडताना नेहमी आपली पाण्याची बाटली जवळ ठेवावी.
– या काळात योग्य प्रमाणात व्यायाम करणे हितावह ठरते. अजिबात व्यायाम न केल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही, तर शारीरिक बल या काळात निसर्गतः कमी असल्यामुळे अतिप्रमाणात व्यायाम केल्यास अशक्तपणा येऊ शकतो, त्यामुळे नियमित योगासने, प्राणायाम करणे, सूर्यनमस्कार घालणे अशा प्रकारचा व्यायाम करावा.