एकीकडे मेक इन इंडियाला प्राधान्य देण्याची भाषा केली जात असताना स्थानिक यंत्रणा देशी कंपन्यांची कोंडी करीत असताना दुसरीकडे परदेशी कंपन्यांना पायघड्या घातल्या जात आहे. पुण्यातही असाच प्रकार घडला.

‘रिफ्लेक्टर टेप्स’ लावणे बंधनकारक

व्यवसायाला परवानगी मिळावी, यासाठी पुण्यातील कंपनीने आठ महिन्यांपूर्वी परिवहन आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे; मात्र आयुक्तालयाने अद्याप काहीच प्रतिसाद दिलेला नाही.

रस्त्यांवरील रात्रीचे अपघात कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनुसार प्रवासी आणि मालवाहू वाहनांना ‘रिफ्लेक्टर टेप्स’ लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यामुळे या संवर्गात नोंद होणाऱ्या नवीन वाहनांना आणि जुन्या वाहनांचे पासिंग करताना, ‘रिफ्लेक्टर टेप्स’ असतील, तर कामे केली जात आहेत.

अटी, शर्थीची पूर्तता करूनही प्रतीक्षा

या आदेशाची २०१९पासून अंमलबजावणी केली जात आहे. परिवहन आयुक्तालयाने ‘रिफ्लेक्टर टेप्स’संदर्भात एप्रिल २०२१मध्ये सुधारित आदेश काढला.

त्यानुसार कंपन्यांना अटी-शर्तींची पूर्तता करून पुन्हा परवानगी घ्यावी लागली. सध्या तीन परदेशी कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे; मात्र सुधारित आदेशातील अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या पुण्याच्या ‘प्रिसमॅटिक रिफ्लेक्शन’ कंपनीला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही.

मूळचे बारामतीचे असलेल्या योगेश शहा यांची ही कंपनी असून, सध्या ते पुणे शहरात स्थायिक आहेत.

प्रमाणपत्र असूनही अडवणूक

परिवहन आयुक्तालयाच्या अटी व शर्तींनुसार प्रवासी आणि मालवाहतुकीच्या वाहनांसाठी ‘रिफ्लेक्टर्स टेप्स’ची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयकॅट) या संस्थांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ‘प्रिसमॅटिक रिफ्लेक्शन’ कंपनीला ‘आयकॅट’चे प्रमाणपत्र प्राप्त आहे.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’त स्थानिक कंपनी नाही ?

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ उपक्रमाची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना उद्देशून ‘घरातून ताकद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ मिळते,’ असे विधान केले होते; मात्र राज्यातीलच कंपनीला शिवसेनेकडे खाते असलेल्या परिवहन मंत्रालयाकडून व्यवसायासाठी ‘बळ’ दिले जात नाही.

उलट सर्व परवानग्या असूनही संबंधित कंपनीला सात महिन्यांपासून प्रतीक्षेत ठेवले आहे, याकडे मुख्यमंत्री लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.