पुणे: पुण्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाचा वाद विकोपाला पोहोचला आहे. यामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक व स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्यातील वाद व आरोप प्रत्यारोप चालूच आहे.
आमदार मुक्ता टिळक यांनी स्थायी समितीकडून सतत कामे अडवली जात आहेत, असा आरोप केला आहे. स्थायी समिती अध्यक्षांना शिवाजी रस्त्याच्या कामाचे दोन कोटींचे वर्गीकरण मंजूर करावे असे सांगूनसुध्दा, प्रस्ताव दोन महिने पुढे घेण्यात आला असल्याचा आरोप आमदार मुक्ता टिळक यांनी केला आहे.
शहारातील शिवाजी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठीचा ”स’ यादीतून दिलेला एक कोटी रुपये वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीने थेट दोन महिने पुढे ढकलला. महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये बाजीराव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली होती.
परंतु रस्त्याची रुंदी कमी असल्याने तांत्रिकदृष्ट्या उड्डाणपूल उभारणे शक्य नव्हते , यापैकी १ कोटी रुपयांचा निधी छत्रपती शिवाजी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वर्गीकरण करून देण्याचा प्रस्ताव आमदार टिळक यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रशासनाला दिला होता; पण प्रशासनाने निधीची गरज नाही असे सांगितले.
असे असताना पुन्हा निधी वर्गीकरण करून मिळावा, अशी मागणी प्रशासनाने केली. यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याशी वर्गीकरणाबाबत चर्चा करून तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला. परंतु स्थायी समितीने वर्गीकरण करण्यास नकार देऊन प्रस्ताव दोन महिने पुढे घेतला असल्याचे टिळक यांनी सांगितले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी रस्त्याच्या कामासाठी आवश्यक तरतूद यापूर्वीच केली गेली होती. त्यामुळे आणखी निधी घेऊन नये. असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. तर मुक्ता टिळक यांनी स्थायी समितीने हेवेदावे त्वरित मिटवावे. रस्ता दुरुस्त करण्यास प्राधान्य द्यावे,असे सांगेतले आहे.