पुणे – काल (बुधवार 31) चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अवघ्या देशभरात धूमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav) निमित्ताने 10 दिवस मंगलमय होतात. आज घराघरांत आणि मंडळांमध्ये ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते तसेच, गोड पदार्थांचा आणि बाप्पाला आवडतात म्हणून उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.

दरम्यान, ऋषिपंचमीनिमित्त आज सकाळी पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अर्थवशीर्ष (dagdusheth ganpati atharvashirsha pathan) पठण करण्यात आले.

पहाटे झालेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामध्ये उत्सव मंडपासमोर 31 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण (atharvashirsha pathan) केले. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाच 35 वं वर्ष आहे.

या यावेळी प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल (anuradha paudwal) उपस्थित होत्या. अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामुळे पुणेकरांची आजची पहाट मंगलमय झाली असल्याचे पाहायला मिळाले.

ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले.

ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर (dagdusheth ganpati) आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला.

यावेळी उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगांनी भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केले.

दरम्यान, या कार्यक्रमाला ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव आदी मान्यवरही उपस्थित होते.