आज वटपौर्णिमा विवाहित महिलांसाठी या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. कारण या दिवशी विवाहित महिला वडाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, तसेच पतीच्या दीर्घायूष्यासाठी प्रार्थना करतात. मात्र अनेकवेळा पती-पत्नीचे किरकोळ वाद विकापाला गेल्याने नको त्या घटना घडतात.

अशीच एक घटना जळगावमध्ये घडली. पती-पत्नीचे किरकोळ वाद विकापाला गेले अन संतापलेल्या पतीने पत्नीवर चक्क चाकूने सपासप वार केले. पूजा सुनील पवार असे या घटनेत मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे कि, जळगाव येथील सुनील भिका पवार व पूजा सुनील पवार (रा.शिवाजी नगर) हे दोघे पती-पत्नी असून पती सुनील पवार हा सतत पत्नी पूजा हिच्यावर संशय घेत होता, त्यामुळे पत्नी नांदायला जात नव्हती.

पूजाचं माहेर पाळधी येथील मारवाडी गल्लीत होतं. तर सासर गेंदालाल मिल येथे होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पूजा माहेरी होती. दरम्यान मंगळवारी पाळधीत पती-पत्नीत वाद झाले होते. त्याची पाळधी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती.

बुधवारी धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील बाजारातून सुनील याने चाकू घेतला. दुपारी दोन वाजता पूजा व सुनील यांच्यात वाद झाला नंतर सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातून वस्तू घेतल्यानंतर लगेच सुनील याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले.

यात ती गंभीर जखमी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला. यावेळी पूजा हीचा शंकर भिका चव्हाण (वय १८) हा जखमी झाला आहे .

पती-पत्नी किरकोळ वाद झाले आणि या वादात एका क्षणात संसाराचे होत्याचे नव्हते झाले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे पाळधीत खळबळ उडाली.